शनिवारी 22 जूनच्या सकाळ पासूनच रेल्वेच्या तीन ही मार्गांवर रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांची पुरती कोंडी झाली आहे. पश्चिम रेल्वे (Western Railway) पाठोपाठ आता मध्ये रेल्वेवर (Central Railway) देखील कसाऱ्या (Kasara-CSMT) वरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल्स 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे पुढील सर्वच स्थानकात प्रवाश्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. कसारा मार्गावरील या विस्कळीत वाहतुकीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र कोणताही बिघाड नसताना कसारा सोबतच कर्जत (Karjat-CSMT) मार्गावरून येणाऱ्या लोकल सेवा उशीराने सुरु असल्याचे समजत आहे.
दरम्यान, मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होणे हे आता नित्याचेच झाले आहे. गेल्याच आठवड्यात सलग पाच दिवस मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.वास्तविक पाहता रेल्वे प्रशासनाने आपण पावसाळ्यापूर्वी रुळांची कामे करून तसेच पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा बनवून उत्तम सेवा पपुरवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पावसाळा सुरु होऊन अवघे दोन आठवडे झाले असताना रोजच्या विस्कळीत सेवांमुळे ही आश्वासने फोल ठरताना दिसत आहेत. यामध्ये वारंवार तांत्रिक बिघाडाचे कारण समोर आले आहे. मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत; वसई, विरार, बोरिवली येथील प्रवाशांचे हाल
अद्याप यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नसून रेल्वेसेवा पुन्हा मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.