Narendra Modi ,Devendra Fadnavis (Photo Credits: PTI, Instagram)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये (COVID Centre) बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. अशा कठिण परिस्थितीत मार्ग काढत महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकार मदतीला धावले आहेत. महाराष्ट्र शासनाने केलेल्या विनंतीनुसार केंद्र सरकारकडून मुंबईत भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी (BPCL) परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी (Jumbo COVID Centre) परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहे.

मुंबईत BPCL जवळ उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरला रोज 10 टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड जनसंपर्क विभागाने दिली आहे. त्याचबरोबर हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- COVID-19 Vaccine: मुंबईत वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरु- किशोरी पेडणेकर

"बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे. यामुळे सुद्धा मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल." असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले.

मुंबईत कोरोनाचे आणखी 5542 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 8478 जणांना डिस्चार्ज दिला गेल्याची माहिती BMC कडून देण्यात आली आहे. दरम्यान आज मुंबईला 1.5 लाख कोविशिल्ड लस प्राप्त झाले असून उद्यापासून सर्व केंद्रांवर कार्यान्वित होतील अशी माहिती बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.