Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Ratnagiri: येत्या 15 जानेवारीला राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, रत्नागिरीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका उमेदवाराचा हृदयविकाराचा झटका येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परशुराम शिगवण असं या मृत उमेदवाराचं नाव आहे. परशुराम यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. परशुराम हे धामापूर ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार होते. मात्र, काळाने त्याच्यावर झाला घातला आणि त्याचं ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

प्राप्त माहितीनुसार, परशुराम शिगवण हे गावातील पॅनल वॉर्ड क्रमांक दोनमधील उमेदवार होते. ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सुरू असताना परशुराम यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान परशुराम यांचा मृत्यू झाला. (वाचा - Bhandara Hospital Fire: तीन मृत मुलांनंतर जन्माला आली होती गोंडस चिमुकली; भंडारा रुग्णालयात लागलेल्या आगीत दाम्पत्याने तिलाही गमावलं)

रत्नागिरी जिल्ह्यात 479 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यातील 360 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तसेच 119 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतीसाठी 4 हजार 332 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (अहमदनगर येथे Google Map च्या सहाय्याने रस्ता शोधणे बेतले जीवावर, धरणात कार बुडून एकाचा मृत्यू)

दरम्यान, पुरंदर तालुक्‍याचे माजी आमदार आणि माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची बहीण शोभा बाळासाहेब यादव यांचे गेल्या गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्या सटलवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सटलवाडी गावात शोककळा पसरली होती.