Buldhana News: काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; उद्धव ठाकरेंची सभा संपताच पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी (Watch Video)
Photo Credit - File Photo

Buldhana News : महाविकास आघाडीचे बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता. २१) खामगाव येथील जे.व्ही. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)ची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची सभा पार पडताच काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या दरम्यान, त्यांनी रस्त्यावर असलेल्या वाहनांच्या काचा ही फोडण्याचा प्रयत्न केला. ( हेही वाचा :Mumbai BJP Office Fire: मुंबईत नरिमन पाँईट येथील भाजप कार्यालयाला आग, किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना शॉर्ट सर्किट )

बुलढाण्यातील उद्धव ठाकरेंची सभा संपताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात चांगलाच राडा झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी सभास्थळावरुन बाहेर पडत असताना खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात काही कारणावरुन बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही नेत्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.

यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.