महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (BS Koshyari) यांच्या अजून एका विधानामुळे राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. कोश्यारींनी काल एका कार्यक्रमात बोलताना "महाराष्ट्रात खास करुन मुंबई (Mumbai) आणि ठाणे येथून गुजराती आणि राजस्थानी लोकांना हटवले तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही. तुम्ही मुंबई आर्थिक राजधानी म्हणता पण गुजराती आणि राजस्थानी लोक नसतील मुंबई ही आर्थिक राजधानीच राहणार नाही," असं विधान करून रोष ओडावून घेतला आहे. यावर मनसे, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून राज्यपालांवर टीका होत आहे. शिवसेना प्रवक्ता संजय राऊत, एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली प्रक्रिया देत राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर यांनी दिलेल्या प्रक्रियेमध्येही त्यांचा सूर राज्यापालांच्या वक्तव्यावर नाराजीचा होता. नक्की वाचा: BS Koshyari Controversial Statement: राज्यपाल कोश्यारींच्या 'मुंबई' बाबतच्या वक्तव्याची Nitesh Rane यांच्याकडून पाठराखण; पहा काय म्हणाले?
संजय राऊत
महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे..
ऐका .. ऐका... pic.twitter.com/dOvC2B0CFu
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
जयंत पाटील
महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का ? राज्यपाल महोदय मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार अपमान का करत आहेत ?
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 30, 2022
सुप्रिया सुळे
राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही 'आमची मुंबई ' आहे.@BSKoshyari
— Supriya Sule (@supriya_sule) July 30, 2022
संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना " महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, १०५ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे, इथे आलाय राज्यपाल म्हणून, आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांच्या पदाचा आदर करतो, त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये" असे म्हटलं आहे.
दरम्यान कोश्यारींचं महाराष्ट्र द्वेष्ट हे पहिलंचं वक्तव्य नाही. यापूर्वीदेखील क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांनी महाराष्ट्राचा रोष ओढावला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर कोश्यारींना नाव न घेता सुनावले होते.