Sonu Sood (PC - Facebook)

बॉलिवूड अभिनेता सोनू सुदच्या (Sonu Sood) जुहू मधील रहिवासी इमारतीचं हॉटेलमध्ये रूपांतरण करण्यावर बीएमसीने (BMC) दिलेल्या नोटीसी प्रकरणी बॉम्बे हाय कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. दरम्यान या सुनावणीत सोनूला दिलासा मिळालेला नाही. सोनू सूदची मुंबई महानगरपालिकेविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिस आणि बीएमसीला कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. Sonu Sood On BMC: महापालिकेच्या वर्तवणूकीमुळे अभिनेता सोनू सूद त्रस्त, 'या' प्रकरणी ट्विट करत अप्रत्यक्षपणे दर्शवली नाराजी.

अभिनेता सोनू सुदने 'शक्तीसागर' या त्याच्या मालकीच्या इमारतीमध्ये बेकायदा बदल आणि बांधकाम करून हॉटेल -लॉजिंग सुरू केल्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर बीएमसीने केलेल्या कारवाई विरोधात सोनूने मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती. बीएमसीच्या पाडकामाच्या नोटीसीला सोनूने अपिलद्वारा आव्हान दिले होते. कारवाई होऊ नये म्हणून अंतरिम दिलासासाठी अर्ज केला होता. मात्र आज न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निकाल सुनावताना अर्ज फेटाळत असल्याचं सांगितलं आहे.

ANI Tweet

दरम्यान काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे अभिनेत्री कंगना रनौतच्या इमारतीवरही बीएमसीने धडक कारवाई केली होती. त्यामध्ये तिच्या कार्यालयाचे बांधकाम तोडले होते. मात्र कंगनाला कोर्टाकडून दिलासा मिळाला तसेच कोट्यावधींची नुकसान भरपाई देखील कंगनाला बीएमसीकडून देण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.

सोनू सुद हा लॉकडाऊनच्या काळात अनेकांसाठी 'संकटमोचक' ठरला होता. त्याने अनेकांना आर्थिक मदत, घरी सुखरूप पोहचण्यासाठी हातभार लावला होता. दरम्यान बीएमसी विरूद्ध सोनू सुद या संघर्षाच्या काळात त्याने एनसीपी नेते शरद पवार यांची देखील भेट घेतली होती.