मुंबई उच्च न्यायलयाने काल (23 एप्रिल) महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या बंगल्यावरील फूटेज ठाणे न्यायिक दंडाधिकार्यांकडे (Thane Judicial Magistrate) सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती 'द हिंदू' च्या वृत्तातून समोर आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबाबत काही आक्षेपार्ह मजूर लिहण्यात आला होता. त्यानंतर एका इंजिनियर तरूणाला यावरून बेदम मारहाण केल्याचं फूटेज समोर आलं होतं. यावेळेस जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्येच त्यांच्या ताफ्यातील काही लोकांनी तरूणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर बेदम मारहाण करण्यात आलेल्या तरुणाची हायकोर्टात धाव.
अनंत करमुसे (Anant Karmuse) या सिव्हिल इंजिनियर तरुणाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधिश जी. एस. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान या तरूणाने असा दावा केला आहे की सोशल मीडियावरील पोस्टवरून आव्हाडांसोबत काम करणार्या काही लोकांनी त्याला बेदम मारले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिड 19 आजारात ऐक्याचं प्रतिक म्हणून दिवे बंद करून 9 मिनिटं पणती, टॉर्च, फ्लॅश लाईट लावण्याचं आवाहन केलं होतं. मात्र त्याला जितेंद्र आव्हाडांनी विरोध दर्शवत दिवे बंद नाही अशी पोस्ट टाकली होती.
अनंत करमुसे या तरूणाने 8 एप्रिल दिवशी आव्हाडांच्या लोकांविरूद्ध किडनॅपिंग आणि गंभीर मारहाणीचे आरोप लावत वर्तक नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी 5 जण अटकेत असून त्यांना पोलिस कोठडीत टाकण्यात आलं आहे. तसेच करमुसेच्या दाव्यानुसार त्याला झालेल्या मारहाणीत काही पोलिस कर्मचार्यांचाही समावेश आहे.
दरम्यान याप्रकरणी Government Counsel दीपक ठाकरे यांनी करमुसेच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. आता उच्च न्यायलयाने राज्य सरकार, पोलिस खात्याला आव्हाडांच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज, कॉल डेटा रेकॉर्ड्स आणि अन्य पुरावे सांभाळून ठेवत ठाणे न्यायिक दंडाधिकार्यांकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत.