राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर बेदम मारहाण करण्यात आलेल्या तरुणाची हायकोर्टात धाव
Mumbai High Court (Photo Credit: ANI)

राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्या प्रकरणी तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यावर 15-20 जणांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तरुणाने प्रसारमाध्यमांना सुद्धा त्याला मारहाण केल्याचे पाठीवरील वळ दाखवले होते. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वर्तकनगर पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता तरुणाने हायकोर्टात धाव घेतली असून या प्रकरणाचा सीबीआय मार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे अडचणीत येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अनंत करमुसे असे तरुणाचे नाव असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याच्या आवाहनानंतर आव्हाड यांनी विरोध दर्शवला होता. परंतु देशभरातील नागरिकांनी मोदी यांच्या आवाहनला पाठिंबा दिला होता. मात्र आव्हान यांनी विरोध केल्यानंतर अनंत याने त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्यानंतर अनंत याच्या घरी दोन पोलीस येत त्यांनी त्याला पोलीस स्थानकात घेऊन जातो असे सांगितल्याचा आरोप त्याने लावला आहे. तसेच त्याला रात्री आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन जात जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचे अनंत याने स्पष्ट केले होते. मारहाण केल्यानंतर अनंतर याने माफी मागत पोस्ट सोशल मीडियातून काढून टाकली होती. तरी सुद्धा त्याला आव्हाड यांच्या समोर मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. (जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मारहाण; वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल)

पोलिसांनी अनंत याला जबरदस्त मारहाण केल्याने रुग्णालयात उपाचार केले. तसेच अनंत याला मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात त्याने पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. तर अनंत याने आव्हाड हे सत्ताधारी पक्षात असून त्यांच्या विरोधात तपासात काही निष्पन्न होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी अनंत याने केली आहे.