पुणे रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ; थांबवलेली रेल्वे वाहतूक तासाभराने सुरळीत
Pune Station (Photo Credits: Twitter)

पुणे रेल्वे स्थानकामध्ये (Pune Railway Station) आज सकाळी 11 च्या सुमारास बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ माजली आहे. ही वस्तू असल्याचं लक्षात येताच तात्काळ पुणे रेल्वे स्थानक रिकामी करण्यात आलं असून रेल्वे देखील थांबवण्यात आल्या होत्या. या वस्तूचा अधिक तपास करण्यासाठी बॉम्बशोधक आणि नाशक पथक, डॉग स्कॉड रेल्वे स्थानकामध्ये आले आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी हे जिलेटीन नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ही वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार बॉम्बसदृश्य वस्तू बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात नेण्यात आल्या आहेत. तिथे त्याचा अधिक तपास केला जात आहे.

संशयास्पद वस्तू

अमिताभ गुप्ता

(हे देखील नक्की वाचा: Mumbai Pune Expressway Accident: ट्र्क-ट्रेलरचा भीषण अपघात; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी).

पुणे रेल्वे स्थानकाच्या दारापाशी ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यानंतर तातडीने नागरिकांना तिथून बाजूला करण्यात आले आहे. तासाभरानंतर पुणे रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वेस्थानकात बॉम्ब ठेवणार आहोत अशाप्रकारच्या धमकीचा निनावी कॉल कंट्रोल रूमला आला होता. त्यानंतर आज हा प्रकार पाहून सार्‍यांची धावाधाव झाली आहे.