Vijay Raaz | (File Image)

आपल्या विनोदी आणि हटके अभिनयामुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेत विजय राझ (Bollywood Actor Vijay Raj) यांना गोंदीया ( Gondia Police) पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपटाच्या सेटवर विनयभंग (Molesting ) केल्याचा आरोप एका महिला सहकाऱ्याने विजय राझ (Vijay Raaz) यांच्यावर केला आहे. विजय राझ आणि त्यांची टीम सध्या 'शेरणी' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विदर्भातील एका ठिकाणी आली आहे. या वेळी रामनगर येथे ही घटना घडल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, 'शेरणी' या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचे मध्य प्रदेश येथील बालघाट जिल्ह्यात शुटींग सुरु आहे. दरम्यान, या चित्रिकरणातील काही भाग विदर्भात चित्रित केला जात आहे. त्यासाठी ही टीम गोंदीया शहरातील हॉटेल गेट वेम येथे उतरली आहे.

चित्रपटाच्या चित्रीकरणातील टीमचा एक घटक असलेल्या महिलेचा विजय राझ यांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. या आरोपावरुन प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन गोंदिया पोलिसांनी विजय राझ यांना अटक केली आहे. पीडित महिलेने गोंदिया येथील रामनगर पोलीस ठाण्यात काल (2 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. (हेही वाचा, Fatima Sana Shaikh: वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला; बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख हिचे वक्तव्य)

अटक केल्यानंतर विजय राझ यांना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने नेमका काय निर्णय दिला याबाबत माहिती समजू शकली नाही. परंतू, पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

दरम्यान, या आधीही बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. तसेच काही महिला कलाकारांनी आणि अभिनेत्रींनी बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांवर मीटू अभियानांतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. लैंगिक शोषणाचा मुद्दा चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राच नेमहीच चर्चेत असतो.