Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

मुंबईमध्ये (Mumbai) कोविड-19 (Coronavirus) तसेच ओमायक्रॉनची (Omicron) वाढती प्रकरणे पाहता, आज मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीएमसी कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी तयारी करणे, 15-18 वयोगटातील मुलांच्या प्रस्तावित लसीकरणाची योजना आखणे, जे जानेवारीच्या सुरुवातीला करायचे आहे, याबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात दररोज 150 प्रकरणांची नोंद होत होती, परंतु आता दररोज सुमारे 2000 प्रकरणे नोंदवली जात आहेत.

मुंबईत आज 2000 रुग्णांची संख्या ओलांडू शकते. त्यामुळे ठाकरे यांनी, घाबरू नका परंतु अत्यंत सावधगिरी बाळगा, असे आवाहन जनतेला केले आहे. ठाकरे यांनी सांगितले की, येत्या 48 तासांत, बीएमसी 15 ते 18 वर्षे वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण मोहिमेची योजना आखण्यासाठी शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधणार आहे. तसेच सर्व कोविड केअर जंबो केंद्रांना वैद्यकीय पायाभूत सुविधांसह सर्व तयारी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

संपूर्णपणे कार्यरत केंद्रांवरील चाचणी आणि ट्रेसिंग प्रोटोकॉलचे देखील पुनरावलोकन केले गेले आहे. येणारे नवीन वर्ष डोळ्यासमोर ठेऊन कोविड योग्य वर्तन मार्गदर्शक तत्त्वे आणि सार्वजनिक ठिकाणी इव्हेंटच्या समस्यांवर देखील चर्चा झाली. शेवटी ठाकरे यांनी सांगितले, पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकतो. प्रकरणे झपाट्याने वाढत असताना, आम्ही सर्वांना विनंती करतो की, घाबरू नका परंतु सावधगिरी बाळगा. लसीकरण करून घ्या, मास्कचा वापर करा.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये दररोज वाढत असलेल्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभुमीवर, मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, 15 दिवसात राज्यामध्ये कोरोनाच्या प्रकरणांची समीक्षा केली जाईल, त्यानंतर राज्यातील शाळा आणि विद्यापीठे बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.