BMC New Swimming Pools: बीएमसी लवकरच खुली करणार मुंबईकरांसाठी नव्याने बांधलेले 3 स्विमिंग पूल्स; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया  6 मार्च पासून सुरू
(Photo Credits: Pixabay)

BMC Swimming Pool Registration : मुंबईकरांसाठी  बीएमसीने (BMC)  नियोजित सहापैकी तीन जलतरण तलाव (Swimming Pool) लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यात हे 3 जलतरण तलाव सुरू होणार आहेत. नव्याने बांधलेल्या तलावांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (Online registration) उद्यापासून म्हणजेच 6मार्चपासून सुरू होत आहे.  यात अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या तलावांचा सामवेश आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 6 मार्चपासून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’तत्त्वावर सुरू होईल. हेही वाचा : Mumbai: खासगी शाळेच्या जलतरण तलावात बुडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

दरम्यान, 2018 मध्ये संपूर्ण शहरात तलावांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव नागरी संस्थेने दिला होता. कोविड-19 च्या उद्रेकामुळे जलतरण तलावांचे काम मंदावले होते. बीएमसीने 2022 मध्ये कांदिवली जलतरण तलाव जनतेसाठी खुला केला. तो 2020 मध्ये वापरासाठी सुरू करण्यात करण्यात येणार होता. मात्र, त्यालाही दोन वर्षांचा विलंब झाला.

बीएमसीचे शिवाजी पार्क (दादर), कांदिवली, दहिसर, चेंबूर आणि घाटकोपर येथील जलतरण तलाव सुरू आहेत. त्यापैकी घाटकोपर येथील जलतरण तलाव गळतीच्या समस्येमुळे 2016 पासून बंद आहे. दरम्यान, बीएमसीने वरळी हिल जलाशय, मालाडमधील चाचा नेहरू गार्डन, अंधेरी पश्चिमेतील इंदिरा गांधी एंटरटेनमेंट पार्क, अंधेरी पूर्वेतील कोंडीविटा, विक्रोळीतील टागोर नगर, दहिसरमधील ज्ञानधारा गार्डन येथे सहा नवीन जलतरण तलाव बांधण्यास सुरुवात केली होती. यापैकी दहिसर, अंधेरी पश्चिम आणि मालाड येथे गेल्या दोन वर्षांत जलतरण तलाव सुरू झाले आहेत. तर उर्वरित पूल या उन्हाळ्यात लहान मुले तसेच प्रौढांसाठी उपलब्ध होतील.

शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी शुल्कात सवलत आणि महिलांसाठी विशेष बॅच आहेत. इच्छुक नागरिक  बुधवार 6 मार्च  सकाळी 6 वाजल्यापासून https://swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळावर आपली नावे नोंदवू शकतात, असे बीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

तीनही जलतरण तलावांमध्ये पुरुषांच्या आणि महिलांच्या पोहण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. पुरूषांसाठी सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ६ ते रात्री १० अशी वेळ आहे. तर, महिलांसाठी सकाळी 11 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळेत विशेष बॅच असेल. या जलतरण तलावांमध्ये सर्वसाधारण श्रेणीसाठी वार्षिक सदस्यत्व शुल्क 8,836 रुपये आहे. महिलांसाठी वार्षिक सदस्यता शुल्क 6,716 रुपये आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, बीएमसीचे सध्याचे तसेच निवृत्त कर्मचारी आणि नगरसेवक यांना वार्षिक ४,५८६ रुपये शुल्क आकारले जाईल.