Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहराभोवती कोरोना व्हायरसचा वेढा दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. मुंबई शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आता कोरोना रुग्णांवर नव्या औषधांचा प्रयोग केला जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांवर Tocilizumab या औषधाचा वापर करण्यात येणार आहे. विशेषतः कोरोना संसर्गामुळे गंभीर स्थितीत असणाऱ्या रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सायन (Sion), नायर (Nair), केईएम (KEM), बीएमसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल्स (BMC Medical College and Hospitals) आणि सेव्हन हिल्स (Seven Hills) या रुग्णालयात Tocilizumab औषधाचा वापर करण्यात येईल. यापूर्वी प्लाझा थेरपीचा प्रयोग कोविड 19 च्या रुग्णांवर केला जात होता.

यापूर्वी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असलेल्या सुमारे 40 रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आला होता. त्यापैकी 30 हून अधिक रुग्णांवर चांगला परिणाम झाला असून 14 रुग्ण पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. Tocilizumab औषधामुळे रुग्णांची प्रकृती सुधारत असून त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्याची गरज भासत नाही. टोसिलिझुमब हे औषध जगभरातील अनेक चिकित्सक आणि रुग्णालयांच्या अनुभवांच्या आधारे वापरले जात आहे. (मुंबई: नायर, कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये Convalescent Plasma Trials साठी ICMR कडून परवानगी)

धारावी मधील 3 रुग्णांवर टोसिलिझुमब औषधाचा प्रयोग करण्यात आला. त्यापैकी 38 वर्षीय रुग्णाची प्रकृती सुधारली असून त्याला नायर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 24427 असून 5125 रुग्ण यातून रिकव्हर झाले आहेत. तर 24427 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. दरम्यान 921 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 24427 रुग्णांपैकी 14947 रुग्ण मुंबईत आहेत. विशेष म्हणजे ही संख्या दिवसागणित वाढत आहे.