
कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहं मागील 8 महिने बंद होती. त्यामुळे नाट्य व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले होते. ही बाब लक्षात घेत नाट्यगृहांच्या भाडेदरात 75 टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नाट्यव्यावसायिकांना दिलासा दिला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. यापूर्वी ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) येथील नाट्यगृहांना भाडे सवलत देण्यात आली होती.
मागील 8 महिन्यांपासून बंद असलेली नाट्यगृहं नोब्हेंबर महिन्यापासून पुन्हा खुली झाली. मात्र त्यातही केवळ 50% प्रेक्षकांच्या उपस्थितीसह नाट्यगृहं सुरु करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने नाटक, कार्यक्रम पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे. या संपूर्ण परिस्थितीचा विचार करता नाट्य निर्मात्यांना नाटकाचे प्रयोग करणं अवघड झालं आहे. त्यामुळे नाट्यगृहांचं भाडं कमी करण्याची मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने महापौरांकडे केली होती. (प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाचा संसर्ग; सात दिवस आयसोलेशनमध्ये राहणार)
या मागणीची दखल घेत नाट्यगृहांच्या भाड्यात 75 टक्के कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवे भाडे 31 मार्च 2021 पर्यंत किंवा 50 टक्के प्रेक्षक उपस्थिती असे पर्यंतच असणार आहे, असे महपौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. या नव्या निर्णयानुसार नाटक किंवा वाद्यवृंदासाठी प्रत्येक प्रयोगासाठी 400 रुपये तिकीट दरापर्यंत 5 हजार रुपये भाडं द्यावं लागणार आहे. तर अमराठी नाटक किंवा वाद्यवृंदास एका कार्यक्रमासाठी 10 हजार भाडे आकारण्यात येणार आहे.
प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली नाट्य मंदिरातील लघु नाट्यगृ़हासाठी 150 रुपये तिकीट दरापर्यंत 3 हजार रुपये+जीएसटी तर अमराठी नाटकासाठी 6 हजार रुपये+जीएसटी असे भाडे आकारण्यात येईल. मुंबईत महानगरपालिकेची प्रबोधनकार ठाकरे, दिनानाथ मंगेशकर आणि महाकवी कालिदास ही 3 नाट्यगृहे आहेत.
दरम्यान, बालनाट्यांच्या प्रयोगावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. तसंच मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग या नियमांचे पालन नीट होण्यासाठी पालिकेकडून अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत.