गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) भाजप आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. प्रामुख्याने दोन्ही पक्षातील प्रमुख नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आरोपांचे खंडणही होत आहे. गोवा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शनिवारी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपवर खंजीर खुपसल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरे हे यांना इतिहास माहिती नाही. या आधीही भाजपसोबत युतीत असताना शिवसेना गोव्यात निवडणूक लढवत होती. पाठिमगचे 20-25 वर्षे हे लोक निवडणूक लढवत आहेत. जिंकले कधीच नाहीत. त्यांचं डिपॉझिटही कधी वाचलं नाही. पण असे असूनही इतिहास विसरून हे लोक बोलतात', असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांच्याकडून झालेल्या आरोपांना उत्तर दिले. भाजप सोबत युतीत असूनही शिवसेना अनेक ठिकाणी भाजपविरोधात लढली आहे. महाराष्ट्राबाहेर ज्या ज्या ठिकाणी हिंदू मतांमध्ये फूट पडेल त्या त्या ठिकाणी शिवसेनेने प्रयत्न केले. रामजन्मभूमी आंदोलन झाल्यानंतर शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्येही 200 जागा लढल्या. मात्र, त्यांना एकाही जागेवर आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. गोव्यातही अनेकदा शिवसेना पूर्ण ताकदीने उतरली. तरीही गोव्यातील जनतेने शिवसेनेला नाकारले. अशी कोणती निवडणूक आहे सांगा, ज्या ठिकाणी भाजप आहे म्हणून शिवसेना लढली नाही?, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. (हेही वाचा, Aditya Thackeray On BJP: भाजपने एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसला- आदित्य ठाकरे)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मतं मागितली. लोकांनी युतीला समर्थन दिले. पुढे केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही युती आणि जनमताचा विश्वास तोडत युतीधर्म मोडला. त्यामुळे राज्याच्या जनतेला माहिती आहे. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, असेही फडणवीस म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते की, शिवसेना (Shiv Sena) मैत्री निभावते. ज्यांना सोबत घेते किंवा ज्यांच्या सोबत असते तर ती पूर्णपणे आपली जबाबदारी निभावते. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही, असा टोला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपला लगावला आहे.