Aditya Thackeray On BJP: भाजपने एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसला- आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray (Photo Credit: ANI/Twitter)

शिवसेना (Shiv Sena) मैत्री निभावते. ज्यांना सोबत घेते किंवा ज्यांच्या सोबत असते तर ती पूर्णपणे आपली जबाबदारी निभावते. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही, असा टोला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपला लगावला आहे. गोवा विधानसभ (Goa Assembly Election 2022) निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष राजकीय प्रचाराला लागले आहेत. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज गोव्यात पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी गोव्याबद्दल असलेला शिवसेनेचा मास्टर प्लान प्रसारमाध्यमांच्या मदतीने गोव्यातील जनतेसमोर ठेवला.

आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, विनायक राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आजच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे काहीसे आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेना हा भूमिपूत्रांचा पक्ष आहे. हा पक्ष नेहमीच भूमिपूत्रांना न्याय देतो. आमचे मित्रपक्ष आज आम्हाला सोडून गेलेआहेत. तरीही आम्ही विविध राज्यांमध्ये स्वत:च्या हिमतीवर लढतो आहोत. (हेही वाचा, Property Tax Exemption In Mumbai: मविआ सरकारकडून नववर्षाचे गिफ्ट, मुंबईकरांचा 500 चौरस फुटाखालील घरांचा मालमत्ता कर माफ)

पाठिमागील पाच वर्षांचा विचार करता भाजपने एनडीएतील जवळपास सर्वच मंत्र्यांच्या पाठीत खजीर खुपसण्याचे काम केले आहे. आजवर आम्ही मैत्री निभावली. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढल्या नाहीत. मात्र, आता लोकांच्या मागणीमुळे आम्ही पक्षविस्तार करतो आहोत. यापुढे शिवसेना प्रत्येक राज्यात निवडणुक लढवणार आहे. शिवसेनेची गरज महाराष्ट्रबाहेरही जाणवत आहे. त्यामुळे आता शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेरही निवडणूक लढवेल असे आदित्य ठाकरे म्हणाले.