‘कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे, काय होतास तू काय झालास तू!' भाजपा महाराष्ट्र ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका
Raj Thackeray | (Photo credit: archived, edited, representative image)

Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) लोकसभा निवडणूक 2019 लढणार नाही. परंतू, या निवडणुकीत कोणतेही बंधन न पाळता भारतीय जनता पक्षाचा पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांचा पराभव करा. जाहीर भाषणातून कार्यकर्त्यांना असा संदेश देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर भाजपने जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र भाजपने भाजपा महाराष्ट्र या आपल्या ट्विटर हँडलवरुन राज ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यासाठी एका व्यंगचित्राचा आधार घेण्यात आला आहे. ‘काय होतास तू काय झालास तू!’अशी कॅप्शन असलेले हे व्यंगचित्र भाजपने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे.

भाजप महाराष्ट्रा या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेले व्यंगचित्र हे लोकसभा निवडणूक 2014 आणि लोकसभा निवडणूक 2019 यादरम्यान राज ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर भाष्य करताना दिसते. व्यंगचित्रात मनसेचे निवडणूक चिन्ह असलेल्या रेल्वे इंजिन आणि डब्यांचा आधार घेण्यात आला आहे. इंजिनचे सारथ्य राज ठाकरे करत असून पक्षाचे इतर लोक मागे डब्यात बसल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, व्यंगचित्राला ‘काय होतास तू काय झालास तू!’ अशी कॅप्शन देत ‘कार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये!’असा खोचक सल्लाही राज ठाकरेंना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (हेही वाचा, मनसे कॅम्पेन: 'निवडणूक येतात आणि जातात! पण अशी सभा होणे नाही!, गुढीपाडव्यापासून देशात नवे ‘राज’पर्व!’)

दरम्यान, हे व्यंगचित्र दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागात ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला पाडण्यासाठी साथ द्या’ अशी कँप्शन सूचवत राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूक 2014 ची भूमका दर्शवण्याचा प्रयत्न दिसतो. तर, दुसऱ्या भागात‘काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या’ म्हणत 2019 मध्ये मनसेची असलेली भूमिका दर्शविण्यात आली आहे. दरम्यान, या चित्रात इंजिनाच्या मागील डब्यात बसलेले कार्यकर्त्यांच्या तोंडी, ‘आपल्याला हे काय मुर्ख समजतात का?’, ‘कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे’असे संवाद कार्यकर्त्यांच्या तोंडी टाकले आहेत. तर, याच चित्रात मनसेच्या डब्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा असलेला डब्बाही जोडल्याचे दाखवले आहे.