MNS Social Media Campaign For Raj Thackerays Speech: लोकसभा निवडणुक न लढण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackerays) यांनी जाहीर केल्यामुळे सध्या मनसे (MNS) कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून काहीसे बाजूला फेकले गेले आहेत. असे असूनही मनसे कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरदार जोश पाहायला मिळतो आहे. कारण, हे कार्यकर्ते सध्या मनसे गुढीपाडवा मेळाव्याच्या (MNS Gudi Padwa Rally) तयारीला लागले आहेत. या तयारीसाठी मनसेने ऑनलाईन कॅम्पेनही सुरु केले आहे. त्यासाठी ‘गुढीपाडव्यापासून देशात नवे ‘राज’पर्व!’ ही पंचलाईन घेऊन कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढी पाडवा (Gudi Padwa 2019) मेळावा प्रतिवर्ष आयोजित केला जातो. पक्षाध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणावरुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात.
मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मनसेच्या ‘गुढीपाडव्यापासून देशात नवे ‘राज’पर्व!’या कॅम्पेनबाबत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. नेटीझन्स, सोशल मीडियावर कार्यरत असलेले मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे, मनसे फेसबुक अकाऊंट आदींचे फॉलोअर्स यांच्याकडून या कॅम्पेनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी उर्मिला मतोंडकर हिने मागितला राज ठाकरे यांच्याकडे मदतीचा हात, मनसे देणार का साथ?)
कॅम्पेनचे वैशिष्ट्य काय?
‘गुढीपाडव्यापासून देशात नवे ‘राज’पर्व!’ अशी या कॅम्पेनची पंचलाईन आहे. तर, “निवडणूक येतात आणि जातात! पण अशी सभा होणे नाही!” या वाक्याने कॅम्पेनचे सादरीकरण केरण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनसेच्या ऑनलाईन कॅम्पेन पोस्टवर पक्ष सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचाही फोटो आहे.
दरम्यान, मनसेने लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, राज ठाकरे यांनी जाहीर भाषणातून पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. तसेच, शक्य असेल त्यात्या ठिकाणी मोदी आणि शाह यांना विरोध करा असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर आले. भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे यांच्यात गेल्या काही काळापासून चांगलेच ट्विटरयुद्ध रंगले आहे. या पार्श्वभूमिवर राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.