Chandrashekhar Bawankule. (Photo Credits: Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) किंवा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षात किंवा त्यांच्या अंतर्गत संघटनेत काय सुरु आहे यावर आम्हाला भाष्य करायचे नाही. शिवसेना असो की राष्ट्रवादी भाजपने हे पक्ष फोडले नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar ) यांच्या धोरणे आणि भूमिकांमुळे त्यांना आज हे दिवस दिसत असल्याचे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही एखाद्याविरोधात कट रचता. तेव्हा तोच कट तुमच्यावरही उलटू शकतो. आता त्यांनी ही परिस्थीती का उद्भवली याबाबत विचार करणे गरजेचे आहे. शरद पवार यांनी सतत धोरणे बदलली. आपल्या कुटुंबीयांशीही ते खोटे बोलले, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

जे शिवसेना पक्षात घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडले आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या रुपात शिवसेना पक्षात बंड झाले. त्यानंतर शिवसेनेचे जवळपास 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झालेले सरकार कोसळले. इतकेच नव्हे देवेंद्र फडणीस यांच्यासोबत शिंदे यांनी थेट सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (हेही वाचा, Lalu Prasad Yadav On Ajit Pawar: म्हातारा माणूस कधी निवृत्त होतो का? राजकारणात निवृत्ती नसते? लालू प्रसाद यांचा शरद पवार यांना पाठिंबा)

राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता वर्ष होते न होते तोवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्फोट झाला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले आणि त्यांनी भाजपसोबत घरोब करत सत्तेत प्रवेश केला. अजित पवार यांच्यासोबत नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याबाबत मात्र, निश्चित माहिती अद्यापही मिळू शकली नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष नुकताच सुरु झाला आहे. दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जात आहे. या दाव्यात किती तथ्य आणि केवळ शब्दांचे बुडबुडे किती याबाबत येणााऱ्या काळात स्पष्टता येऊ शकणार आहे.