महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. मराठा कार्यकर्त्यांनी देखील राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला. दरम्यान, कर्नाटकमध्ये मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून 50 कोटींची तरतूद देखील केली आहे. यावरुन आता राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले जात आहे. भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया नोंदवत 'महाराष्ट्रात पुन्हा एकदा फडणवीस सरकार हवं' असल्याचं म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, 50 हजार कोटींची तरतूद पण केली!!! आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले.. म्हणून पाहिजे परत एकदा.. फडणवीस सरकार!!!" (Nitesh Rane Criticizes Uddhav Thackeray: 'टाचणी तैयार आहे, फक्त योग्य वेळ येऊन दया' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर नितेश राणे यांची टीका)
नितेश राणे ट्विट:
कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली!!!
आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले..
म्हणून पाहिजे परत एकदा..
फडणवीस सरकार!!! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— nitesh rane (@NiteshNRane) November 16, 2020
बसवकल्याण विधानसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात असलेला बसवकल्याण मतदारसंघ महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे. या भागात मराठी भाषकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान, हीच बाब लक्षात घेऊन मराठा नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे. वित्त विभागाच्या मान्यतेने या प्राधिकरणासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे,' असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, सरकार मराठा समाजासोबत असून आरक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसंच आंदोलन, मोर्चे न काढण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.