Pankaja Munde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी डावलल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत. नाराज कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांच्या रोषाला आज (12 जून) केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना सामोरे जावे लागले. पंकजा मुंडे यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भागवत कराड आणि दरेकर यांचा ताफा आडवला. या वेळी कार्यकर्ते संतप्त होऊन घोषणाबाजी करत होते. दरम्यान, पोलिसानी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली आणि कराड, दरेकर यांचे वेगवेगले ताफे पुढे गेले.

बीड येथे प्रविण दरेकारांना विरोध

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आज बिड दौऱ्यावर होते. शिवसंक्रामचे नेते विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या उपस्थिती दर्शविण्यासाठी प्रविण दरेकर हे बिड दौऱ्यावर होते. हा कार्यक्रम आटोपून दरेकर पुढील कार्यक्रमासाठी निघाले असता पंकजा मुंडे समर्थक तिथे आले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली कार्यकर्ते घोषणा देत आणि विरोध व्यक्त करत असताना दरेकरांनी गाडी न रोखता पुढे नेली. त्यामुळे कार्यकर्ते आणखीच संतप्त झाले आणि ते थेट गाड्यांसमोर आडवे झाले. या सर्व गडबडीत एक पोलीस आणि एक मुंडे समर्थक असे दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आज सकाळी पारगाव तर दुपारी बीड शहरातील बार्शी रोडवरील धांडे नगर परिसरात घडली. मुंडे समर्थकांनी दोन वेळा दरेकरांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, MLC Election 2022: पंकजा मुंडे यांचा पत्ता कट, भाजपने विधानरिषद नाकारण्याची काय कारणे असू शकतात?)

कराड यांनाही विरोध

औरंगाबाद येथेही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद येथील मुंडे समर्थकांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ताफा अडवला. औरंगाबाद येथील क्रांती चौकातील कार्यालयाकडे कराड यांचा ताफा आला असता काही मुंडे समर्थकांनी अचानक घोषणाबाजी सुरु केली. तसेच, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमल्याने त्यांनी कराड यांचा ताफा अडवला.

पंकजा मुंडे यांना पक्षातून हेतुपुरस्पर डावलले जात असल्याची भावना काही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दरम्यान, कराड यांचा ताफा अडवल्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांना असे काही घडू शकते याची आगोदरच कल्पना असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. परिणामी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना यश आले.