Cruise Ship Drug Case: 'खान' असल्यामुळे नवाब मलिक इतके ओरडत आहेत का? नितेश राणे यांचा सवाल
Nitesh Rane | (Photo Credits: Twitter)

क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्स पार्टीतील (Cruise Ship Drug Party) एनसीबीच्या (NCB) छाप्यानंतर अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सह काही जणांना याला अटक करण्यात आलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) वारंवार एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबी आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावर आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सवाल केले आहेत. खान असल्यामुळे नवाब मलिक इतके ओरडत आहेत का? असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे.

नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये लिहितात, "नवाब मलिक इतके ओरडत का आहेत? कारण तो खान आहे !! आणि सुशांत सिंह राजपूत नाही? फक्त त्याचे नाव खान असल्यामुळे तो बळी पडला? आणि कारण सुशांत हिंदू होता तो ड्रग अॅडिक्ट झाला ??"

नितेश राणे ट्विट:

नितेश राणे यांनी या घटनेचा संबंध सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी जोडल्याने त्याला धर्माचा रंग दिला आहे. यामुळे या प्रकरणात अधिक वादंग उठण्याची शक्यता आहे.

दरम्यान, क्रुझवरील छापेमारीत एनसीबीने एकूण 11 जणांना पकडले. त्यापैकी 3 जणांना सोडण्यात आले. अमिर फर्निचरवाला, रिशब सचदेव आणि प्रतीक गाभा अशी या तिघांची नावे असून ते भाजप नेत्यांचे नातेवाईक आहेत, असे आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत. तसंच एनसीबीचा छापा बनावट असून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल्स डिटेल्स तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मलिक यांच्या या आरोपांनंतर एनसीबीने देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांना चोख उत्तर दिले आहे. तसंच त्यांचे आरोपही फेटाळून लावले आहेत. दरम्यान, एनसीबी पुढील कारवाई करत असून आर्यन खान याच्या ड्रायव्हरची चौकशी केली जात आहे.