राज्यात सध्या क्रुझ ड्रग पार्टी प्रकरण चांगलंच गाजत आहे. याप्रकरणी एनसीबी (NCB) करत असलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आज सकाळच्या प्रत्रकार परिषेदत त्यांनी पुन्हा एकदा एनसीबीला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. रेव्ह पार्टीतून एनसीबीने 3 जणांना सोडून दिले. ते तिघेही भाजप नेत्यांचे नातेवाईक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर आता एनसीबीने उत्तर दिलं आहे. 3 जणांना नाही तर 6 जणांना सोडून दिल्याचे एनसीबीने सांगितले आहे.
क्रुझवरील ड्रग पार्टीवर टाकलेल्या छाप्यावेळी, एकूण 3 नाही तर 6 जणांना सोडून देण्यात आलं आहे. छापा टाकल्यानंतर एकूण 14 जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. या सर्वांना कलम 67 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर सर्वांची तपासणी करुन त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. 14 जणांपैकी 8 जणांना पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आली. तर 6 जणांना पुराव्याअभावी सोडून देण्यात आलं, असं स्पष्टीकरण एनसीबीने पत्रकार परिषदेत दिलं.
तसंच एनसीबीवर करण्यात आलेले आरोप निराधार असून त्यांनी ते फेटाळून लावले आहेत. जात, धर्म, भाषा यानुसार एनसीबी काम करत नसल्याचेही एनसीबीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी मनिष भानूशाली यांच्यावरुन केलेल्या आरोपावर बोलताना एनसीबीने सांगितलं की, आरोपींना घेऊन जाण्यास मनिष भानूशाली यांना कोणीही आदेश दिले नव्हते. कॅमेऱ्याची गर्दी होती म्हणून त्यांनी आरोपींना नेले असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
काय म्हणाले होते नवाब मलिक?
क्रुझवरील छापेमारीत एनसीबीने एकूण 11 जणांना पकडले. त्यापैकी 3 जणांना सोडण्यात आले. अमिर फर्निचरवाला, रिशब सचदेव आणि प्रतीक गाभा अशी या तिघांची नावे असून ते भाजप नेत्यांचे नातेवाईक आहेत. छापा मारला तेव्हा क्रुझवर 1300 लोक होते. त्यापैकी केवळ निवडक 11 लोकांना पकडले. त्यातही तिघांना का सोडले? (क्रूज ड्रग्स पार्टी छाप्यावेळी एनसीबीने भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना सोडले- नवाब मलिक)
दरम्यान, एनसीबीचा छापा बनावट असून भाजप आणि एनसीबी मिळून बॉलिवूडला बदमान करण्याचे काम करत आहे. एनसीबीचे पुढील टार्गेट शाहरुख खान आहे, अशा प्रकराचे गंभीर आरोप देखील नवाब मलिक यांनी यापूर्वी केले आहेत.