धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni) नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या (Bjp Leader) दुकानात तब्बल 170 प्राणघातक शस्त्रे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण गुन्हे शाखेने (Kalyan Crime Branch) केलेल्या कारवाईत ही धक्कादायक घटना उघडकीस आली. धनंजय कुलकर्णी हा डोंबिवली भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. तो 49 वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन आधारवाडी तुरुंगात पाठवले आहे.
प्राप्त माहितीनुसार, धनंजय कुलकर्णी याचे तपस्या फॅशन हाऊस नावाचे दुकान आहे. हे दुकान डोंबिवली येथील महावीरनगर परिसरातील अरिहंत नावाच्या इमारतीच्या तळमजल्यावर आहे. भाजप पदाधिकारी असलेला धनंजय कुलकर्णी हा या दुकानाचा मालक आहे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कुलकर्णीच्या दुकानावर छापा टाकला. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेबसाईट धोक्यात, हॅकरने ट्वीटरवरुन दिला इशारा)
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठा शस्त्रसाठा हाती लागला. पोलिसांनी ताब्यात घेतलेला एकूण शस्त्रसाठा सुमारे 2 लाख रुपयांचा आहे. या शस्त्रसाठ्यात पिस्तूलही आहे. धनंजय कुलकर्णी हा भाजपच डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे. पदाधिकाऱ्याच्या घरातच मोठा शस्त्रसाठा सापडल्याने भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.