केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला महाराष्ट्रभरातून विरोध झाल्यानंतर कांदा निर्यात बंदी त्वरीत मागे घ्यावी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल (Union Commerce & Industry Minister Piyush Goyal) यांना पत्र लिहून केली आहे. या पत्रात फडणवीसांनी म्हटले की, "या विषयावर आपली फोनवर सविस्तर चर्चा झाली आहे आणि त्यावेळेस मी कांदा निर्यातीवर लावण्यात आलेली बंदी उठवावी, अशी विनंती तुम्हाला केली होती. तरी पुन्हा एकदा मी विनंती करतो की, कांदा निर्यातीवर लावण्यात आलेली बंदी त्वरीत मागे घेण्यात यावी. महाराष्ट्राच्या कांद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असते आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे शेतकरी दुःखी आहे. यावर तुम्ही त्वरीत योग्य निर्णय घ्याल," अशी मला आशा आहे.
देशात कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने एका पत्रकाद्वारे जाहीर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. दरम्यान कांदा निर्यातीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे शेतकरी संतप्त झाले असून यामुळे कांद्याच्या दरात वाढ होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. (महाराष्ट्र: केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीवर शेतकरी आक्रमक, सरकारने फेरविचार करावा अशी शरद पवारांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी)
ANI Tweet:
Former Maharashtra CM & BJP leader Devendra Fadnavis
writes to Union Commerce & Industry Minister Piyush Goyal, requesting him to lift the ban on onion exports pic.twitter.com/fWHWfbzJJM
— ANI (@ANI) September 16, 2020
दरम्यान कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर राजकर्त्ये देखील आक्रमक झाले आहेत. कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारची चूक असल्याचे भाजप नेते उद्यनराजे भोसले यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कांदा निर्यात बंदीचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. तसंच यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.