Devendra Fadnavis: भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी एक नवी जबाबदारी, वाचा सविस्तर
Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (Rambhau Mhalgi Prabodhini) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईत आज पार पडलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.

या आमसभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात आहे. महाविकास आघाडीच्या दुसऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी विविध मुद्द्यावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये ते काही अंशी यशस्वीही झाले. यातच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने संघाला याचा अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Maratha Reservation: महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला- चंद्रकांत पाटील

दरम्यान, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेद्वारे अनेकदा भाजप कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच आयोजित करण्यात आलेल्या अशा अभ्यासवर्गाला राज्यातील भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.