Ashish Shelar & CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

'राज्यातील आरोग्य केंद्र बंद करुन मंदिरं उघडू का?' असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल एका कार्यक्रमात उपस्थित केला होता. यावरुन आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता दाखवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

"डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का, याच उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येत आहेत. त्याच्यावर तुम्ही भाष्य करणार का?" असंही शेलार म्हणाले. (Ashish Shelar Criticizes Shiv Sena: शिवसेनेचेच शुद्धीकरण करावे लागेल, आशिष शेलार यांचा टोला)

त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 'पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि नंतर हे सगळं खुलं केलं जातं. कट कमिशनच्या आधारे सरकार निर्णय घेतं का? एक्साइजची कमाई हवी म्हणून दारूची दुकानं उघडी केलीत. मॉल मधल्या कामगारांचं कारण सांगून मॉल उघडे केलेत. मग मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धूप, फुलं विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत याबद्दल करोनाचे नियम करून परवानगी दिली जाऊ शकत नाही का? पण ते होणार नाही, कारण हा गरीब माणूस सरकारच्या वाटाघाटीच्या अपेक्षा काय पूर्ण करू शकत नाही,' असे अनेक सवाल शेलार यांनी उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "आरोग्य केंद्रे हवीच, पण कट कमिशनवर नको," ही भाजपची भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याचं काम शिवसेना करत आहे. हा करोना बंदीचा कार्यक्रम नाही तर हे शिवसेनेचं देऊळ बंदीचं अभियान आहे. आरोग्य केंद्रांच्या बाता मारणाऱ्या सरकारनं देवालयं बंद करून शवालयं उघडली आहेत, अशी जोरदार टीकाही शेलार यांनी केली.

दरम्यान, काल कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्याला मंदिरांची की आरोग्य मंदिरांची गरज अधिक आहे? असा सवाल उपस्थित करत विरोधकांना टोला लगावला होता.