Nilesh Rane on Ajit Pawar: 'उपमुख्यमंत्री आहात, विचार करुन बोला'; निलेश राणे यांचा पुन्हा अजित पवार यांच्यावर निशाणा
Nilesh Rane & Ajit Pawar (Photo Credits: Facebook, Twitter)

राज्यात कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट असताना राजकीय पक्षांमधील वाद गेल्या काही दिवसांत उफाळून आले आहेत. एखाद्या मुद्द्यावरुन टीका-टीपण्णी, आरोप-प्रत्यारोप असा खेळ रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'उपमुख्यमंत्री आहात, विचार करुन बोललं पाहिजे' असं निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

निलेश राणे ट्विटमध्ये लिहितात, "अजित पवार म्हणतात माझ्याकडे भाजपचे किती आमदार येतात ते पहा. पवार साहेब ते तुमच्याकडे नाही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल त्यादिवशी आमदार सोडाच पण नारळपाणी विकणारा पण तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, विचार करुन बोललं पाहिजे."

निलेश राणे ट्विट:

(हे ही वाचा: 'महाराष्ट्राची वाट लावू नका'; निलेश राणे यांचा अजित पवार यांना टोला)

यापूर्वी देखील अनेकदा निलेश राणे यांनी अजित पवार यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले होते. दरम्यान, 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांचा पाठिंबा भाजपाला दिला होता. त्यानंतर पहाटे राजभवनावर जावून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र तीन दिवसांतच अजित पवारांनी पाठिंबा काढून घेतला आणि भाजपचं सरकार पडलं. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत टीकेचे राजकारण रंगत आहे.