Nilesh Rane & Ajit Pawar (Photo Credits: Facebook, Twitter)

राज्यात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे कोविड-19 (Covid-19) चा वाढता धोका टाळण्यासाठी सरकारने राज्यातील विविध ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर अनेकदा लॉकडाऊनचा (Lockdown) इशाराही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे काल मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरुन भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे त्यांनी उपमुख्य्मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला आहे. "लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणार नाही. महाराष्ट्राची वाट लावू नका," अशा शब्दांत त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका." (महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या निलेश राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारले)

निलेश राणे ट्विट:

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना नियमांचे नागरिकांकडून होत असलेले उल्लंघन यामुळेच लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठीत दिले आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा त्वरीत वाढवण्याचे आव्हानही सरकारपुढे आहे.