भाजप (BJP) नेते नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) हे विविध मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, निलेश राणे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री मिळणार, अशी चर्चा रंगली असून आता अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली आहे, असे निलेश राणे म्हणाले होते. यावर आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही', असे म्हणत अजित पवारांनी निलेश राणेंना सणसणीत टोला लगावला आहे.
नुकताच अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच निलेश राणे यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत म्हणाले की, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचे नाव घेऊन त्यांना मोठे करायचे? तसेच राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपद असण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना समसमान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे फॉर्मुला आधीच ठरलेला आहे, त्यात कोणताही बदल नाही, असेही अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्र: वाढत्या वीजबिलाविरोधात राज्यात भाजपचे 'टाळे ठोको' आंदोलन
निलेश राणे काय म्हणाले?
अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. पण आता 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, अशा आशयाचे ट्वीट निलेश राणे केले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. तर, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे. परंतु, निलेश राणे यांनी केलेला हा दावा राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चेच्या आधारे केला असल्याचे सांगितले जात आहे.