Maharashtra Assembly Elections 2019: बिग बॉसचे कलाकार लागले निवडणुकीच्या कामाला; कोथरूडमध्ये करणार 'या' गोष्टीचा प्रचार
बिग बॉसचे कलाकार (संग्रहित संपादित प्रतिमा)

मतदान (Voting) करणे हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात पुण्यात सर्वात कमी मतदान झाले होते. विधानसभेवेळी (Maharashtra Assembly Elections) तरी असे घडू नये म्हणून आता बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) कलाकारांसह मराठी चित्रपटसृष्टीमधील काही कलाकार मतदान जनजागृती करणार आहेत. म्हणजेच सुजान नागरिकाने मतदान करावे याचा प्रचार करणार आहेत. पुण्यातील कोथरूड परिसरात ‘व्होट अप कोथरूड’ या नावाने ही जनजागृती होणार आहे. या परिसरात हे कलाकार लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी हा उपक्रम पार पडणार आहे.

या जनजागृतीमध्ये बोह बॉस शो मुळे अल्पावधीत लोकप्रियता मिळवणारे आरोह वेलणकर, नेहा शितोळे, मैथिली जावकर इ. कलाकार असणार आहेत. त्यांच्यासोबत  अक्षय टांकसाळे, पल्लवी पाटील, प्रसाद जावडे, निखिल राजेशिर्के आदी कलाकारही यामध्ये आपला सहभाग नोंदवणार आहेत. याधी सोशल मिडीयावरून या कलाकारांनी आपल्या या उपक्रमाला सुरुवात केली आहे. याबाबत बोलताना आरोह म्हणाला, ‘एक कलाकार म्हणून आम्हाला लोकांचे भरपूर प्रेम मिळते. मात्र याच प्रसिद्धीचा फायदा घेऊन आम्ही एखाद्या सामाजिक विषयावर जनजागृती करत असू तर ती आमच्यासाठी समाधानकारक बाब आहे.’

देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे सुशिक्षित नागरिकही मतदान करण्यास निरुत्साही असतो. मात्र मतदान करणे हे आपले एक महत्वाचे कर्तव्य आहे. हा हक्क प्रत्येक भारतीयाने बजावणे गरजेचे आहे. असे झाले नाही तर तुम्हाला पुढील पाच वर्षे येणाऱ्या सरकारबद्दल बोलण्याचा हक्क नाही असा सल्ला दिला जातो. यामुळेच मतदान करणे किती गरजेचे आहे ते हे कलाकार पटवून सांगणार आहेत.