काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) काढलेल्या 'भारत जोडो यात्रे'ला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा मजलदरमजल करत पुढे पुढे जात आहे. सध्या कर्नाटक राज्यात असलेली ही 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) लवकरच महाराष्ट्रात (Bharat Jodo Yatra in Maharashtra) प्रवेश करत आहे. प्राप्त माहितीनुसार, भारत जोडो यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, ही यात्रा येत्या 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 14 दिवसांत एकूण 382 किलोमीटरची पायपीट करणार आहेत. ‘भारत जोडो यात्रा’ पाच जिल्ह्यांतून जाणार असून, ते दोन जाहीर सभांनाही संबोधित करणार आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसमधील सूत्रांनी म्हटले आहे की, शरद पवार हे 9 नोव्हेंबर रोजी नांदेड येथील भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. तर, उद्धव ठाकरे हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. परंतू, त्यांचे वेळापत्रक अद्याप निश्चित झाले नाही.दरम्यान, राहुल गांधी यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होतील असे काँग्रेस सूत्रांचे म्हणने आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून यात्रेत सहभागी होण्याबाबत अद्याप कोणतेही दुजोरा मिळाला नाही. (हेही वाचा, Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रेतील हृदयस्पर्शी क्षण; काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेकांना मिळाली प्रेरणा)
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
काँग्रेस नेत्यांनी म्हटले की, भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी महाराष्ट्रात दोन सभा घेणार आहेत.पहिली सभा नांदेड शहरात असेल जिथून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. दुसरी सभा यात्रा हे राज्य सोडण्यापूर्वी शेगाव, बुलढाणा येथे असेल. नांदेडचा मेळावा 9 नोव्हेंबरला होणार असून त्यात पवारही सहभागी होण्याची शक्यता आहे.
‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झाली. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी 3,500 किमीहून अधिक अंतर पायी चालणार आहे. ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी आहे. ही यात्रा केरळ, कर्नाटक राज्यातून पुढे आली आहे. ती सध्या आंध्र प्रदेशात आहे. तेलंगणा व्यापल्यानंतर ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल.