अनेकदा टीम इंडियाच्या विजयाची मिरवणूक असेल किंवा मुंबई मध्ये हेरिटेज टूर दरम्यान काही क्षण अविस्मरणीय करण्याची संधी ही खुल्या डबल डेबर बसने दिली आहे. पण आता बेस्ट कडून ही बस बंद केली जाणार आहे. 5 ऑक्टोबर पासून निलांबरी बससेवा स्थगित होणार आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार बसचं आयुर्मान पाहता आता ही बस थांबवण्याची वेळ आली आहे. बेस्ट कडे अशा 3 बस होत्या पण ट्प्प्याटप्प्याने त्या हद्दपार करण्यात आल्या आहेत.
जानेवारी 1997 पासून या नॉन एसी डबलडेकर बस चालवल्या जात होत्या. यामध्ये दिवसाला 150-250 प्रवासी येत होते. मुंबईत पाऊस, सणासुदीचा काळ आणि संध्याकाळच्या वेळेस या बसला मोठा प्रतिसाद मिळत होता.
“आम्ही या बसेसच्या निरोपासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत आहोत. ओपन-डेक डबल डेकर बसेस भविष्यात खरेदी केल्या जातील की नाही यावर आम्ही अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही,”असं बेस्टच्या अधिकाऱ्याने HT शी बोलताना सांगितले आहे. यापूर्वी, अशा सुमारे 50 ओपन-डेक बसेस, ज्या खालच्या डेकवर वातानुकूलित असू शकतात, प्रस्तावित होत्या. मात्र, हा प्रस्ताव कधीच मंजूर झालेला नाही. आता पर्यटकांचा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावरच या बस हद्दपार केल्या जात आहेत.
ओपन डेक बस मधून दक्षिण मुंबई मधील अनेक जुन्या वास्तू पर्यटकांना न्याहाळता येत होत्या, ही बस पर्यटकांना गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, एशियाटिक लायब्ररी अशा महत्त्वाच्या ठिकाणांवरून घेऊन जात होती. काही बस मध्ये गाईडची सोय सुरू करण्यात आली होती. जो पर्यटकांना त्या त्या स्थळांची माहिती सांगत त्यांचा प्रवास संस्मरणीय करत होता.