महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2019 (Maharashtra Assembly Eections 2019) साठी शिवसेनेने (Shiv Sena) जाहीर केलेल्या वचननाम्यातील एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले होते, ती म्हणजे 10 रुपयांत थाळी. शिवसेनेच्या या आश्वासनाबाबत काही प्रमाणात टीकाही झाली होती. त्यानंतर काश्मीरमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे 10 रुपयांमध्ये थाळी ही योजना सुरु केली. महाराष्ट्रात शिवसेनेची ही योजना जेव्हा सुरु होईल तेव्हा होईल, मात्र मुंबईचे डबेवाले (Mumbai Dabbawala) लवकरच ही योजना सुरु करणार आहेत. म्हणजेच मुंबईचे डबेवाले 10 रुपयांमध्ये थाळी उपलब्ध करून देणार आहेत.
मुंबई डबेवाला असोशिएशनने याबाबत पुढाकार घेतला असून, अन्नवाटपासाठी विक्रोळी हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. विक्रोळीच्या टागोरनगर येथे दुपारी 12 ते 2 तर रात्री 7 ते 9 या वेळेत ही 10 रुपयांमधील थाळी उपलब्ध केली जाणार आहे. डॉ. पवन अग्रवाल हे मुंबईच्या डबेवाल्यांवर पीएचडी करत आहेत, त्यांनी आपली जागा या योजनेसाठी दिली आहे. याबाबत बोलताना डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले, ‘काहीही करू, वेळप्रसंगी तोटा सहन करू मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 10 रुपयांत थाळी ही योजना यशस्वी करून दाखवू.’
(हेही वाचा: शिवसेनेच्या 10 रु. मध्ये थाळी योजनेला सुरवात; प्रतिदिन 500 लोकांसाठी बनणार 'साहब खाना')
दरम्यान, याआधी ठाण्यामध्ये खारटन रोड येथे काही तरुणांनी पुढाकार घेऊन 10 रुपयांत भात व भाजी देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. मात्र आता मुंबईचे डबेवाले 10 रुपयांत सकस व पोटभर थाळी उपलब्ध करून देणार आहे. सध्या विक्रोळी येथील जागेत काही बदल केले जात आहेत, ते पुनर झाल्यावर येत्या 15 दिवसांत ही योजना सुरु केली जाईल.