साहब खाना (संग्रहित संपादित प्रतिमा)

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या वचननाम्यात 10 रुपयांमध्ये पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. आता याच धर्तीवर जम्मूमध्ये (Jammu) शिवसेनेने आज आपली 'साहब खाना' (Saheb Khana) योजना सुरू केली. या योजने अंतर्गत शिवसेना गरजू व गरीब लोकांना दहा रुपयांमध्ये जेवण पुरवत आहे. जम्मूमध्ये सध्या ही योजना शिवसेनेच्या कार्यालयात सुरू झाली आहे. मात्र हळूहळू जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, श्री महाराजा गुलाबसिंग रुग्णालय आणि जम्मू तवी रेल्वे स्थानकात हे दहा रुपयांमध्ये पूर्ण जेवण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र निवडणुकीत शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे की, प्रत्येक सामान्य व्यक्तीला दहा रुपयांत पूर्ण जेवण दिले जाईल. आता ही योजना जम्मू-काश्मीरमध्ये सुरू झाली आहे. जम्मूमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनीष साहनी यांनी याबाबत बोलताना, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रीय सचिव अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार आजपासून ही ‘साहेब खाना योजना; सुरू केली गेली असल्याचे सांगितले.

जवळजवळ 500 लोकांसाठी दररोज ही थाळी उपलब्ध होणार आहे. यामध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी यांचा समावेश असणार आहे. बक्षी नगर आणि शालमार रुग्णालयातही लवकरच शिवसेना ही सेवा सुरू करणार आहे. साहेब खाना सुरू होताच बुधवारी अनेकांनी या भोजनाच फायदा घेतला आणि शिवसेनेचे आभार मानले.