Ambajogai Road Firing: महाराष्ट्राच कायदा आणि सुव्यस्थेच्या चिंधड्या उडू पाहात आहेत. कधी पत्रकाराला मारहाण, कधी उधारीचे पैसे मागितले म्हणून गोळबार केला जातो आहे. बीड (Beed Firing) जिल्ह्यातील परळी येथील अंबाजोगाई रोडवर तर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. कारण काय तर सिगारेटचे पाकीट महाग का दिले? इतक्या क्षुल्लख कारणावरुन थेट बंदुकीतून तीन फैरी झाडण्यात आल्या. परळी शहरानजीक असलेल्या कण्हेरवाडी शिवारात ही घटना घडली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसर हादरुन गेला.
काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीतून आलेल्या एका व्क्तीने चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले, असा जाब विचारत गोळीबार केल्याची माहिती आहे. हा व्यक्ती आंबेजोगाईकडून परळीकडे जात होता, असेही सांगितले जात आहे. अधिक माहिती अशी की, सुरेश फड यांचे कण्हेरवाडी शिवारात यशराज हॉटेल आहे. जे परळीपासून नजीक असून ते विलास आघाव मागील एक वर्षांपासून चालवतात. याच हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास चार व्यक्ती चहा पिण्यासाठी आल्या. त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांकडे सिगारेटचे पाकिट मागितले. त्यांनी पाकीट महाग का दिले? असा जाब विचारत हॉटेल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यातून शब्दाने शब्द वाढत गेला. प्रकरण हातघाईवर आले. मारामारीपर्यंत पोहोचले.
दरम्यान, शाब्दीक बाचाबाची सुरु असताना ग्राहक म्हणून आलेल्या या चौघांपैकी एकाने थेट बंदुक काढली आणि थेट हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून कर्मचाऱ्यांनी हॉटेलचे शटर बंद केले. त्यानंतर सदर व्यक्तीने दुसरे दोन राऊंड हॉटेलच्या शटरवर फायर केले. विलास आघाव यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. प्राप्त फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.