Balasaheb Thorat | (Photo Credits: Facebook)

केंद्र सरकारने शेतक-यांसाठी कृषी विधेयकं आणल्यानंतर देशभरातील तमाम शेतक-यांसह विरोधकानी या बिलाला विरोध दर्शवला आहे. त्यासाठी देशभरातून ठिकठिकाणी आंदोलने होत असून पंजाबमध्ये रेल्वे रोकोही करण्यात आला आहे. यात आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पुढाकार घेत येत्या 15 ऑक्टोबरला महाराष्ट्रात शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅलीचे (Shetkari Bachao Virtual Rally) आयोजन करणार असल्याची घोषणा केली आहे. एकाच वेळी राज्यातील 10,000 गावांत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे असेही त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्रात 15 ऑक्टोबरला होणारी रॅली ही राज्यातील भव्य रॅली असून या रॅलीच्या माध्यमातून 50 लाख शेतक-यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. Rahul Gandhi Anti Farm Law Protest: काँग्रेसचे 'खेती बचाओ' अभियान; राहुल गांधीनी चालवला ट्रॅक्टर

ही रॅली सोशल मिडियावर देखील पाहता येणार आहे त्यासंबंधीची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून शेतक-यांवर हे कायदे लादले आहेत. उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणलेल्या या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, शेतक-यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

येत्या 15 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजता या शेतकीर बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण अशा 5 वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर विधेयकाच्या विरोधात देशभर पडसाद उमटत आहेत. पंजाब (Punjab) आणि हरियाणा (Haryana) या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. तसेच, महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही आक्रमक पवित्र्यात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही शेतकरी संघटना या विधेयकाविरुद्ध आंदोलन करत आहेत.