23 जानेवारी दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची 97 वी जयंती (Bal Thackeray Jayanti) आहे. या जयंतीचं औचित्य साधत महाराष्ट्र राज्य विधिमंडळामध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. पण या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र जाणं टाळण्यासाठी ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. पण विधिमंडळापासूनच काही अंतरावर असलेल्या रिगल टॉकीज जवळ मात्र उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी येणार आहेत.
दरम्यान शिवसेनेतील फूटीनंतर हा पहिलाच जयंतीचा दिवस आल्याने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून रिगल जवळ बाळासाहेबांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करण्यासोबतच सायनच्या षण्मुखानंद हॉल मध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. षण्मुखानंद मध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांची विधिमंडळातील कार्यक्रमाला अनुपस्थिती असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Shiv Sena Symbol Hearing: धनुष्यबाण नेमका कुणाचा? निवडणूक आयोगाकडून सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश; पुढील सुनावणी 30 जानेवारीला .
शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडूनही पक्षावर दावा केला जात आहे. सध्या न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोरही याबाबतची सुनावणी प्रलंबित आहे. दरम्यान 23 जानेवारीनंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची देखील नेमणूक पुन्हा वैध की अवैध यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे.
लोकसत्ता सोबत बोलताना खासदार अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे संध्याकाळी ठाकरे गटाकडून आयोजित दोन कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे अन्य कार्यक्रमांबद्दल ठाऊक नसल्याचं म्हटलं आहे.
सरकारच्या निमंत्रण पत्रिकेमध्येही उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना ते प्रोटोकॉलमध्ये बसत नाही. कुटुंबीय म्हणून ठाकरेंना स्वतंत्र निमंत्रण पत्रिका दिली जाईल असं सांगण्यात आले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या विधानपरिषदेकडून आमदारकी आहे. तर आदित्य ठाकरे विधानसभेत आमदार आहेत.