बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात (Badlapur Sexual Assault Case) एक अतिशय महत्त्वाची घडामोड घडली आहे. तातडीने कारवाई करण्यास उशीर केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आणि आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर अखेर ठाणे पोलिसांनी आदर्श विद्यामंदिर बदलापूर (Adarsh Vidya Mandir) शाळेच्या दोन विश्वस्तांना बुधवारी (2 ऑक्टोबर) अटक केली आहे. शाळा अध्यक्ष उदय कोतवाल (Uday Kotwal) आणि शाला सचिव तुषार आपटे (Tushar Apte) अशी या दोघांची नावे आहेत. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना कर्जत येथून अटक केली.
मुंबई हायकोर्टाच्या बडग्यानंतर अटक
बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर नावाच्या एका शाळेत बालवाडीतील चार आणि पाच वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये घडलेल्या या घटनेमुळे व्यापक जनआक्रोश झाला आहे. कोर्टातही हे प्रकरण खळबळ माजवत आहे. ज्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यास या आधीच अटक करण्यात आली आहे. मात्र, पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला. तो शाळेत सफाई कामगार होता. (हेही वाचा, Badlapur Sexual Assault: बदलापूर प्रकरणातील आरोपी Akshay Shinde Encounter बाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत)
अक्षय शिंदे याचे काय झाले?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आणि संशयित आरोपी अक्षय शिंदे नावाचा शाळेचा सफाई कामगार 23 सप्टेंबर रोजी पोलिसांशी झालेल्या कथित गोळीबारात मारला गेला. शिदे याने केलेल्या कथीत कृत्याबाबत समाजामध्ये वाच्यता होताच मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश पाहायला मिळाला. बदलापूर येथील स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. रेल्वेमार्ग रोखून धरले. परिणामी मोठी कारवाई करत पोलिसांनी अक्षय शिंदे यास 17 ऑगस्ट अटक करण्यात आली. मात्र, विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी घेऊन जात असताना अक्षय याने एका पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यात मारहाण केली. या वेळी पोलिसांनी कथीतपणे स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कळवा सिव्हिल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा, Adarsh School Badlapur Sexual Assault Case: अक्षय शिंदेला मारणाऱ्या पोलिसाला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर; शिवसेना नेते Mahesh Gaikwad यांची घोषणा)
कोर्टाने फटकारताच कोतवाल आणि आपटे यांना अटक
उदय कोतवाल (शाळेचे अध्यक्ष) आणि तुषार आपटे (शाळेचे सचिव) यांना अटक करण्यास विलंब केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालायने पोलिसांना जोरदार झापले. तसेच, या दोघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळून लावला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने, इतर प्रकरणांमध्ये त्वरित अटक करण्यासाठी ओळखले जाणारे पोलीस विश्वस्तांना अटक करण्यात कसे अपयशी ठरले, असा सवाल केला. घटनेबद्दल माहिती असल्यास लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्ह्याचा अहवाल देण्याच्या विश्वस्तांच्या कायदेशीर जबाबदारीवर न्यायालयाने भर दिला. कोर्टानेच कानउघडणी केल्यावर पोलिसांनी विश्वस्तांना तत्काळ अटक केली.
अटक झाली पुढे काय?
न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाणे गुन्हे शाखेने 2 ऑक्टोबर रोजी विश्वस्तांना अटक केली आणि त्यांना प्रकरणाची देखरेख करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) ताब्यात दिले. विश्वस्तांना गुरुवारी, 3 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलीस सूत्रांनी म्हटले.
बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने नागरिक आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडितांना त्वरित न्याय मिळावा अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. पोलीस हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळत आहेत, विशेषतः विश्वस्तांना अटक करण्यास उशीर करणे, यावर तीव्र टीका झाली आहे, उच्च न्यायालयाच्या फटकारामुळे ही टीका आणखी तीव्र झाली आहे.
महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:
महिला किंवा अल्पवयीन मुले/मुली यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अथवा शारीरिक, मानसिक अत्याचाराविरुद्ध तत्काळ मदत मागता येते. त्यासाठी खाली फोन क्रमांकावर संपर्क साध
चाइल्डलाइन इंडिया – 1098; हरवलेली मुले आणि महिला – 1094; महिला हेल्पलाइन - 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग – 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन – 7827170170; पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - 1091/1291.