ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांनी (Auto Rickshaw-Taxi Union) पुकारलेला 15 संप्टेंबरपासूनचा संप अनिश्चित काळासाठी स्थगित (Auto Rickshaw-Taxi Union Strike Postponed) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संघटेच्या निर्णयानंतर मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या अध्यक्षतेखाली ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मागण्या आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात 13 सप्टेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीला मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) विविध टॅक्सी आणि रिक्षा संघटनांचे दोन डझनहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर शहरातील टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी प्रस्तावित संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
सरकारकडून ठोस अश्वासन- ए एल क्वाड्रोस
मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए एल क्वाड्रोस यांनी माहिती देताना प्रसारमाध्यमांना सांगितले, उद्योग मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की त्यांचे सरकार भाडेवाढीसह रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या अनेक समस्यांवर 10 दिवसांच्या आत नियमन करण्यासाठी ठोस निर्णय घेईल.
संघटनेचे नेते ए एल क्वाड्रोस यांनी सरकारकडे ऑटो-ट्रॅक्सी वाहतुकीच्या भाडेवाढीची मागणी केली . मागणी मान्य करा नाहीतर 15 सप्टेंबरपासून आम्ही बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. (हेही वाचा, Taxi and Auto Rickshaw Fare: मुंबईमध्ये टॅक्सी आणि रिक्षाचा प्रवास महागण्याची शक्यता; युनिअनने केली दरवाढीची मागणी)
काय आहेत ऑटो, टॅक्सी चालकांच्या मागण्या
सध्या मीटर असलेल्या टॅक्सींचे किमान भाडे 25 रुपये असून, भाडे 30 रुपये करण्याची मागणी युनियनने केली आहे. त्याचप्रमाणे रिक्षा संघटनाही किमान भाडे 21 रुपयांवरून 23 रुपये करण्याची मागणी करत आहेत. वाढते इंधन दर, खराब रस्ते आणि महागाई यामुळे ही दरवाढ करावी अशी संघटनांची मागणी आहे.
ऑटो रिक्षा , टॅक्सी व्यवसायासाठी सीएनजी गॅस 40% सवलतीच्या द्या- शशांक राव
उद्योगमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनच्या वतीने अध्यक्ष शशांक राव यांनी ऑटोरिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत सविस्तर मांडणी केली. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायासाठी वापरला जाणारा सीएनजी गॅस 40% सवलतीच्या दराने देण्यात यावा . जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत खटुआ समितीच्या शिफारशीनुसार रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात अंतरिम वाढ करण्यात यावी" अशी मागणी राव यांनी केली.
ट्विट
ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांनी १५ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा घेतलेला निर्णय स्थगित करण्यात आल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले आहे. pic.twitter.com/uHlq7vB8iQ
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 14, 2022
फायनान्स कंपन्यानंकडून गुंडांचा वापर
शशांक राव यांनी याच बैठकीत, ऑटोरिक्षा चालक आणि मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणीही केली. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील रिक्षाचालकांना रिक्षांसाठी घेतलेले कर्ज वेळेवर फेडता आलेले नाही. फायनान्स कंपन्या गुंडांच्या माध्यमातून धमकावून आणि बळाचा गैरवापर करुन रिक्षा बेकायदेशीरपणे जप्त करत आहेत. या फायनान्स कंपन्यांवर फौजदारी कारवाई करून न्याय द्यावा. रिक्षा बेकायदेशीरपणे जप्त करण्यास मनाई करून रिक्षा चालकांना संरक्षण देण्यात यावे, असेही राव पुढे म्हणाले.
उद्योगमंत्र्यांसोब झालेल्या या बैठकीला मुंबई रिक्षावाले युनियनचे नेते थँपी कुरियन हेसुद्धा उपस्थित होते. रिक्षाचालकांच्या पार्किंगचा प्रश्न सोडविण्याची विनंती त्यांनी मंत्र्यांना केली. या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले आणि लवकरच आणखी एक बैठक घेऊन या मागण्या पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन युनियनच्या प्रतिनिधींना दिले, असे कुरीयन यांनी सांगितले.