
कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचा परिणाम मुंबईकरांना लवकरच भोगावा लागणार आहे. मुंबईमध्ये टॅक्सी आणि रिक्षाचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. 7 एप्रिल रोजी, टॅक्सी युनियनने काळ्या-पिवळ्या कॅबच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. याआधी अशी मागणी ऑटो-रिक्षा संघटनांनी केली होती, ज्यावर 8 एप्रिल रोजी होणार्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. गुरुवारी टॅक्सी युनियनने अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांना पत्र लिहून काळ्या-पिवळ्या टॅक्सी भाड्यात वाढ करण्याची मागणी केली.
या पत्रात 1 मार्च 2021 पासून सीएनजीच्या किमती 35 टक्क्यांनी वाढल्याचे नमूद केले आहे. गेल्या सात महिन्यांत सीएनजीची किंमत 51 रुपयांवरून 67 रुपयांवर पोहोचल्याचा दावा युनियनमधील सूत्रांनी केला आहे. याआधी टॅक्सीचे भाडे 1 मार्च 2021 पासून 22 रुपयांवरून 25 रुपये करण्यात आले होते. परंतु ही शेवटची भाड्यातील सुधारणा झाल्यानंतर सीएनजीच्या किमतीत 35 टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. खटुआ समितीच्या अहवालानुसार, सीएनजीची किंमत 25 टक्क्यांच्या पुढे गेल्यास टॅक्सी भाडे विलंब न करता सुधारणे आवश्यक आहे', असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने लिहिलेल्या म्हटले आहे.
‘सीएनजीच्या दरात 35 टक्क्यांहून अधिक वाढ होऊनही परिवहन विभाग टॅक्सी भाड्यात सुधारणा करत नाही. गरीब टॅक्सी चालक, ज्यांच्या कमाईला कोविड-19 मुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये मोठा फटका बसला आहे, त्यांना या सीएनजी दरवाढीमुळे आणखी नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणून आम्ही किमान टॅक्सी भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये पर्यंत सुधारित करण्याची विनंती केली आहे.’ मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे प्रमुख असलेले ज्येष्ठ नेते ए एल क्वाड्रोस यांनी सांगितले. (हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालयाकडून 22 एप्रिल पर्यंत कामावर रूजू होण्याचे कर्मचार्यांना आदेश)
टॅक्सी युनियनने म्हटले होते की, अलीकडेच वाहतूक दंड वाढल्यामुळे त्यांच्या चालकांची संख्या 30 टक्क्यांनी घसरली आहे. ऑटो-रिक्षा संघटनाही भाडेवाढीची मागणी करत आहेत. त्यांनीही त्यांच्या मागणीमागे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाल्याचा उल्लेख केला आहे. मूळ भाडे तसेच प्रति किलोमीटरच्या किमतीत सुधारणा करणे आवश्यक असल्याचे, ऑटो रिक्षा युनियनचे नेते थम्पी कुरियन यांनी सांगितले. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 7 रुपयांनी वाढ केली, जी 6 एप्रिलपासून लागू झाली.