प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

एटीएसने (ATS) बुधवारी पुण्यात (Pune) मोठी कारवाई करत, अंमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचा भांडाफोड केला. बंदी घातलेल्या मादक पदार्थांची निर्मिती आणि वितरणात गुंतलेल्या, या कार्टेलविरूद्ध ही कारवाई केली गेली आहे. एटीएसने केलेल्या छापेमारीत 5.4 कोटी रुपयांची, अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी औषधे आणि कच्चे रसायने जप्त करण्यात आली आहेत.

या कारवाईचे नेतृत्व करणारे एटीएसच्या जुहू युनिटचे निरीक्षक, दया नायक यांनी मिरर ऑनलाईनला दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या कच्च्या रसायनांमधून, 80 लाखांचे क्रिस्टल मेफेड्रोन (Crystalline Mephedrone) ताब्यात घेण्यात आले आहे.

या जप्त करण्यात आलेल्या क्रिस्टल मेफेड्रोनपासून सुमारे 80 कोटी रुपयांचे (देशांतर्गत बाजारात) एमडी (अंमली पदार्थ) तयार केले जाऊ शकते. या छापेमारीवेळी कारखान्यात सापडलेल्या तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे नायक यांनी सांगितले. गेल्या वर्षी 6 डिसेंबरला या प्रकरणाबाबत, विलेपार्ले येथून 49 वर्षीय महेंद्र परशुराम पाटील आणि 29 वर्षीय संतोष बाळासाहेब आडके, या अंमली पदार्थांसाठी औषध पुरवठा करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.

यांच्या अटकेमुळेच अनुक्रमे मुंबई आणि पुण्यातील सासवड येथील, 14.3 किलोग्राम एमडी ताब्यात घेण्यात आला. बाजारात याची किंमत सुमारे 5.6 कोटी रुपये होती. मात्र, या दोघांच्या चौकशीमधून फारसे काही निष्पन्न झाले नाही. सध्या त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आडके यांच्या बँकेतील खात्यामध्ये झालेल्या व्यवहारावरून पुण्यातील या औषधांच्या कारखान्याची माहिती मिळाली. (हेही वाचा: Narcotics Control Bureau ची मोठी कारवाई; भारतातून 100 कोटी तर ऑस्ट्रेलियामधून 1 हजार 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त)

त्यानंतर एटीएसने सासवडच्या औद्योगिक परिसरात याबाबत माहिती देणाऱ्या लोकांना गाठले. आजूबाजूच्या परिसरात केलेय चौकशीमधून, पुरंदर येथील श्री अल्फा केमिकल्समधील कामगारांपैकी एकाची ओळख पटली. त्यानंतर बुधवारी दुपारी एटीएसने त्या कारखान्यावर छापा टाकला.