Narcotics Control Bureau ची मोठी कारवाई; भारतातून 100 कोटी तर ऑस्ट्रेलियामधून 1 हजार 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
Narcotics Control Bureau (PC- Twitter)

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 1300 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील 100 कोटी रुपयांचे ड्रग्ज भारतातून पकडण्यात आले आहे. तसेच ऑस्ट्रेलियामधून 1200 कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने तसेच इतर काही एजंसीने संयुक्तरीत्या टाकलेल्या धाडीमध्ये ऐवढ्या मोठ्या रक्कमेचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईत भारतातील 9 जणांना अटक करण्यात आले आहे, असे वृत्त 'झी 24 तास' या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार, या ड्रग्ज रॅकेटचे कनेक्शन दिल्ली-एनसीआर, पंजाब, उत्तराखंड, महाराष्ट्रपासून ते ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडोनेशिया, श्रीलंका आणि कोलंबियापर्यंत पोहोचले आहे. या कारवाईमध्ये 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील 5 आरोपी भारतीय, 1 आरोपी अमेरिकन तर 2 नायझेरियन तसेच एक आरोपी इंडोनिशयन आहे. (हेही वाचा - एमडीसह अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 5 ड्रग्जमाफियांना अटक, 53 कोटींचे ड्रग्ज जप्त)

भारतात मुंबई तसेच इतर मोठ्या शहरात अंमली पदार्थांची विक्री होते. हे अंमली पदार्थ भारताबाहेरून आणले जातात. शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत. मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्याविरोधात राबविलेल्या मोहिमेत गेल्या 19 महिन्यात 1 हजार 81 कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची माहिती एका आरटीआयमध्ये देण्यात आली होती. या कारवायांमध्ये मुंबई पोलिसांनी 1073 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी आदींचा समावेश आहे.