Ashadhi Wari 2023: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पंढरपूरसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी; भाविकांना मिळणार 'या' सुविधा
Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

आषाढी यात्रेच्या (Ashadhi Wari 2023) पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने तातडीने 10 कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत 73 कोटी 80 लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि 368 कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वारकरी केंद्रबिंदू ठेवून पंढरपूर मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करा. मंदिराचे प्राचीन वैभव कायम ठेवत भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा यांची सांगड घालण्याचे काम करा. यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरात येत असतात अशावेळी घाट सुशोभीकरण, रस्ते दुरूस्ती तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी यात्रा अनुदान 5 कोटीवरून 10 कोटी रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. (हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 26 मे रोजी नाशिकमध्ये होणार समृद्धी द्रुतगती मार्गाच्या शिर्डी-भारवीर भागाचे उद्घाटन)

पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पंढरपूर मंदिर विकास आराखड्यात 73 कोटी 80 लाख रुपयांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचे सादरीकरण पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. या आराखड्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे. जतन आणि संवर्धन कामांमध्ये अनियोजित अनावश्यक जोडण्या काढणे, पाणी गळती रोखणे, दगडी बांधकाम आवश्यकतेनुसार दुरूस्त करणे, मंदिर परिसरातील दीपमाळांची पुनर्बांधणी करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भाविकांसाठी ऑनलाईन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.