Arvind Sawant | Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा (MP Navneet Rana) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांच्या प्रकरणाबाबत मुद्दा उपस्थित केल्याने, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना धमकावले आणि ते म्हणाले, की, ‘तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच पाहतो. तुलाही तुरुंगात टाकू'. ही बाब जोर धरत असताना आता, अरविंद सावंत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी असे काहीही म्हणालो नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राणा यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, 'मनसुख हिरेन खून आणि सचिन वाझे प्रकरणामध्ये, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांच्या पत्राबद्दल ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संसदेत मी हे प्रश्न ठाकरे सरकारच्या विरोधात उपस्थित केले. महिला खासदार लोकशाही परंपरेनुसार, महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेविरोधात प्रश्न उपस्थित केल्याने, अरविंद सावंत यांनी, 'तुम्ही महाराष्ट्रात कसे फिरता हे मी पाहतो आणि तुला जेलमध्ये टाकेन अशी धमकी दिली.'

त्यांनी पुढे लिहिले आहे की, ‘यापूर्वी शिवसेनेच्या लेटर हेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर एसिड टाकण्याची, मला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.’ राणा म्हणाल्या की, ‘ज्याप्रकारे शिवसेनेच्या खासदाराने मला धमकावले आहे, तो फक्त माझा अपमान नाही तर संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे.’ आपल्या तक्रारीत त्यांनी अरविंद सावंत यांच्यावर कठोर पोलिस कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आता यावर भाष्य करत अरविंद सावंत म्हणाले आहेत की, 'मी त्यांना धमकी का देणार? मला नवनीत राणा चांगल्या माहित आहेत, जेव्हा जेव्हा आपण त्यांना भेटतो तेव्हा त्या मला भाऊ म्हणतात. त्यावेळी त्यांच्याजवळ जे काही लोक उपस्थित असतील त्यांनी सांगावे की मी धमकी दिली का नाही. त्या ज्या प्रकारे बोलतात ते मला आवडत नाहीत आणि जेव्हा जेव्हा त्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांची शरीरभाषा अत्यंत अपमानास्पद असते. त्या नेहमी अशाच बोलतात, हे काही नवीन नाही. मी शिवसैनिक आहे, जाताना मी त्यांना का धमकी देऊ.' असा सवाल सावंत यांनी केला आहे. रिपब्लिकने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा: MP Navneet Ravi Rana: नवनीत राणा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप)

दुसरीकडे नवनीत राणा यांना भाजपच्या आणखी एका खासदार रामा देवी यांचा पाठिंबा मिळाला. एएनआयशी बोलताना रामा देवी म्हणाल्या, ‘या प्रकरणात नवनीत राणा माझ्याशी बोलल्या आहेत. खासदार म्हणून अरविंद सावंत यांनी असे बोलू नये. मी लोकसभेच्या सभापतींना सांगेन की त्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी.’