Arvind Sawant Booked Over 'Imported Maal' Remark: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) मतदानाला आता अवघे 19 दिवस उरले आहेत. राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात राजकीय पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करताना सातत्याने वादग्रस्त विधाने केली जात आहेत. नुकतेच उद्धव गटाचे नेते आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शिवसेना (शिंदे गट) नेत्या शायना एनसी (Shaina NC) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. याबाबत शायना एनसी यांनी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर आता सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी शिवसेनेचे (यूबीटी) खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्या म्हणाल्या की, मी वस्तू नाही, मी एक स्त्री आहे. उद्धव ठाकरे गप्प आहेत, नाना पटोले गप्प आहेत, पण मुंबईच्या महिला गप्प बसणार नाहीत. दुसरीकडे, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करत, उद्धव गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना एनसीकडे माफी मागावी अशी मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून शायना एनसी यांना विधानसभेचे तिकीट दिले आहे. ज्या दिवशी त्यांना तिकीट देण्यात आले त्याच दिवशी त्यांनी भाजप सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेचे (यूबीटी) नेते अरविंद सावंत मंगळवारी म्हणाले, ‘त्यांची अवस्था बघा, त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या राहिली आणि आता त्या दुसऱ्या पक्षात गेल्या. 'इम्पोर्टेड माल' इथे (मुंबादेवी) चालत नाही, इथे फक्त अस्सल (लोकल) माल चालतो, जो आमचा आहे.’ (हेही वाचा: Shaina NC on Arvind Sawant's Sexist Remark: 'मी महिला आहे माल नाही' अरविंद सावंत यांच्या टीपण्णी वर भडकल्या शायना एन सी)
सावंत यांच्या या वक्तव्यानंतर खूपच गदारोळ माजला. याबाबत पत्रकारांशी बोलताना शायना म्हणाल्या, ‘महाविनाश आघाडी महिलांचा आदर करत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी 20 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे आणि मी कोणत्या निष्ठेने काम केले हे सर्वांना माहीत आहे. मी एक स्त्री आहे, वस्तू नाही. मी मुंबईची मुलगी आहे, मला मुंबादेवी आणि आई मुंबादेवीचा आशीर्वाद आहे. मी कोणाची मालमत्ता नाही.’