DGP Rajneesh Seth (Pic Credit - ANI)

महाराष्ट्राचे नवे डीजीपी रजनीश सेठ (DGP Rajneesh Seth) असतील. त्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी (DGP) नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्याकडून ते राज्याच्या डीजीपी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आतापर्यंत संजय पांडे यांच्याकडे डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार होता. राज्याला पूर्णवेळ डीजीपी नाही, अशी टीका विरोधक सातत्याने करत असत.  पूर्णवेळ डीजीपी नसल्याबद्दलही न्यायालयाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे आता सरकारने संजय पांडे यांच्याकडून डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार काढून रजनीश सेठ यांची राज्याच्या डीजीपीपदी नियुक्ती केली आहे. रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्रचे प्रमुख आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. संजय पांडे एप्रिल 2021 पासून राज्याच्या डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. हेही वाचा Maharashtra Airports: औरंगाबाद विमानतळाला मिळणार छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव; शिर्डी आणि कोल्हापूर एअरपोर्टचेही नाव बदलणार

या मागण्या लक्षात घेऊन अखेर शुक्रवारी (18 फेब्रुवारी) रजनीश सेठ यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी फोर्स वनची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा रजनीश सेठ या संघाचे प्रमुख होते. रजनीश सेठ हे दोन वर्षे मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्तही होते.

राज्यातील पोलीस महासंचालकांची नियुक्ती एका प्रक्रियेद्वारे केली जाते. राज्यातील 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) पाठवली आहेत. यूपीएससीने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली आहे. या तिघांपैकी कोणत्याही एकाची डीजीपी पदावर नियुक्ती केली जाते. हेमंत नागराळे, के. व्यंकटेशम, रजनीश सेठ यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. या नावांपैकी रजनीश सेठ यांची सरतेशेवटी निवड करण्यात आली आहे.