Arnab Goswami | (File Image)

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तत्कालीन सरकारने अन्वय नाईक प्रकरण Anvay Naik Case) दाबले. या प्रकरणाची आता चौकशी सुरु आहे. पोलीस कायद्यानुसार काम करत आहेत. या प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप नाही, असे सांगतानाच रिपब्लिक भारत टीव्हीचे(Republic Bharat TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना झालेली अटक आणि पत्रकारिता यांचा काहीही संबंध नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अन्वय नाईक प्रकरणात रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आहे. या अटकेवरुन विरोधक (भाजप) आक्रमक झाला आहे. सरकार सुडबुद्धीने कारवाई करते आहे. प्रसारमाध्यमांचा आवाज दडपण्यासाठीच सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या आरोपाला जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अर्नब गोस्वामी यांना झालेली अटक आणि पत्रकारिता यांचा संबंध नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी पुढे म्हटले की, गोस्वामी यांनी आपल्या खासगी आयुष्यातील व्यवाहारात एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे संबंधित कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली असा आरोप आहे. त्याबाबतचा तपशील मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) लिहून ठेवला. या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांचे नाव आहे. यात केवळ गोस्वामी एकट्याचेच नव्हे तर आणखीही दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा, Arnab Goswami यांची तळोजा जेल मध्ये रवानगी; न्यायालयीन कोठडीत मोबाईल फोन वापरुन नियमांचे उल्लंघन)

अन्वय नाईक या प्रकरणाची चौकशीही राज्य सरकारच्या नव्हे तर न्यायालयाच्या परवानगीने पुन्हा सुरु करण्या आली आहे. या आधीच्या सरकारने हे प्रकरण दाबले होते. गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. कायदेशीर प्रक्रिया पाहता आरोपीला पोलिस स्टेशनला बोलवून त्याचा जबाब नोंदवला जातो. या प्रकरणात मात्र तसे घडले नाही. आगोदरच्या सरकाच्या काळात या प्रकरणात उलटाच प्रकार घडला, असेही जयंत पाटील यांनी या वेळी सांगितले.