मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवली सराटी (Antarwali Sarathi)
मध्ये जमलेल्या आंदोलकांवर सप्टेंबर महिन्यात दगडफेक, लाठी चार्ज झाल्याचा प्रकार समोर आला होता. या दगडफेक प्रकरणामध्ये आता आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरे यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अंतरवली सराटीमध्ये झालेल्या या संघर्षाचे पडसाद राज्यभर उमटले होते.
ऋषिकेश बेदरे वर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू असताना तो 2 साथीदारांसह सापडला. पोलिसांनी त्यांच्यावर 307 कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार, अंतरवली सराटी मध्ये लाठीचार्जचे आदेश हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नव्हते. माहितीच्या अधिकार्यात मागवलेल्या माहितीमध्ये जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी ही माहिती दिली आहे.
जालनाच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेक देखील झाली होती. यामध्ये महिला देखील जबर जखमी झाल्या होत्या. यानंतर दोषींवर कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडून देण्यात आले होते.
नेमकं काय घडलं होतं?
जालना मध्ये आंदोलन सुरू असताना पोलिसांनी कायदा सुव्यस्था राखण्याच्या आणि जरांंगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याच्या दृष्टीने, उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांना केली होती. तीन वेळा पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा झाली होती. पावणेसहा वाजता उपोषणाच्या व्यासपीठा समोर बसलेले आंदोलक आणि पोलीस समोरासमोर आले आणि एकच गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ पांगवण्यासाठी पोलिसांनी पावणेसहा वाजता लाठीचार्ज केला. संतप्त गावकरी आणि आंदोलकांनी दगडफेक सुरू केली, यामध्ये शेकडो आंदोलक आणि 45 पोलीस जखमी झाले होते. त्याच रात्री अनेक भागात जाळपोळ झाली होती.