ठाकरे सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर केली जाणार
Uddhav-Thackeray-Farmers (Photo Credit: Wikimedia Commons/ IANS)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने आपल्या कार्यकाळातील शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी (First List of Farmer's Loan Waiver) सोमवारी जाहीर केली होती. यानंतर उद्धव ठाकरे शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी (Second List of Farmer's Loan Waiver) 28 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या सरकारने केली आहे. पहिल्या यादीत 2 लाखापेक्षा कमी कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता. दुसऱ्या यादीत 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, पहिल्या यादीत 20 ते 25 हजार शेतकऱ्यांना या जोजनेचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती महाविकास आगाडीचे मंत्री बच्चू कडू यांनी दिली होती.

डिसेंबर महिन्यात नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. 'ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, ते कर्ज माफ करण्यात येईल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे. मार्च 2020 पासून ही योजना लागू होईल', असे ते विधानसभेत म्हणाले होते. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली आहे. त्यापैकी एकूण 68 गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उर्वरीत शेतकऱ्यांच्या नावांची यादी टप्प्याटप्याने जाहीर केली आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. पहिल्या यादीत एकूण 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 43 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती. हे देखील वाचा- महाराष्ट्रात लवकरच 'दिशा कायदा' लागू होणार; गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती

ठाकरे सरकारच्या घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. विधीमडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिल्या दिवसापासून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली होती. यावेळी सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिकाच रचत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केला होता.